होड्या
सदू आणि मधू मावसभाऊ होते दोघे
शेजारच्या गावांमध्ये घर होते त्यांचे साधे ।
सुट्टीत उन्हाळ्याच्या मामाच्या गावी गेले
सुबक कागदी होड्या करण्या शिकून आले ।।
सदूने छान केल्या होड्या, वाट पाहत बसला
आकाश का बरसेना, जरी आखाड सरला ।
येती वार्यासंगे धारा मधू सोडतसे होड्या
ढगफुटी संगे गारा होई चिखलच सारा ।।
हिरमुसलेले दोघे, डोळे पुसत पळती
बाबासुद्धा त्यांचे आज कसे हताश दिसती ।
सदूच्या हो शेतातले उभे पीक करपले
मधूचे शिवार सारे पावसाने वाहू नेले ।।
धरित्री माय माझी, अशी का गं तू रुसली
बोळक्या तोंडाची माऊली विषण्ण हसली ।
लेकरांनो ऐका आता, थांबवा हा उतमात
माय मायाळू म्हणून कोपराने का खणत? ।।
भस्मासुर उभे केले जळ सारे उपसले
नाही उरला ओलावा मग डोळा पाणी आले ।
चढेवाढे तापमान अंगांगाची होते लाही
कुर्हाडीने सपासप वार तुम्ही केले नाही? ।।
धरतीने घ्यावे सदा किती अपराध पोटी
धूर कचरा गिळूनी कृपा करावी का मोठी? ।
पाय लावतो गे माये आजा मागतसे माफी
पोर नाची थयाथया आज तिच्या उरीपोटी ।।
नका फवारू रे विष शेताशिवारात पुन्हा
सर्व जगाचा पोशिंदा आटेल बा तिचा पान्हा ।
रोज नवीन जखमा साहवत ना वेदना
होड्या पुन्हा सोडावया जागी ठेवा संवेदना ।।
-- आसावरी गोखले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा