मैत्री
मैत्री वरती काय बोलावे, सगळेच अगम्य जिथे|
नाही बंधन, नाही अपेक्षा, तळमळ फक्त असे तिथे ||
निखळ आनंद, निर्मळ हास्य वसे जिथे |
नात्यासही सुंदर बनवी, मैत्री जेव्हा शिरे तिथे ||
ना जात - पात, ना स्री - पुरुष, ना बंधन तिला वयाचे |
प्राणीमात्रांसवेही सख्य जुळते मानवाचे ||
भावनांच्या उंच लाटांमधले हे एक किरण आशेचे |
अंतराळी तर ग्रह-तारेही खेळ खेळती मैत्रीचे ||
सुग्रीवासवे रघुनंदन धागे विणतो मैत्रीचे |
शामसावळा कृष्णही खातो पोहे सुदाम्याचे ||
- ©किर्ती पांडव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा