गजरा..
-------
उन्ह उतरली..संध्याकाळ झाली..
पोऱ्या येऊन दार वाजवून गेला..
दमून भागून आडव तिडव झोपली होती ती..
झोप चाळवली तरी ती तशीच पडून राहिली..
काल पहाट झाली होती कामं संपायला..
शेवटचं गिऱ्हाईक गेलं तेव्हा मशिदीची बांग ऐकली होती तिने..
अंग मोडून आल होत..
दारातून गजऱ्याची पुडी सरकली..
त्या वासाने तिची झोप मोडली.. मळमळायला लागल्यासारखं झालं..
तिला आठवल तिचं कोकणातलं घर..
लहानपणी तिला गजऱ्याच काय वेड होत..!
दारात अबोली सतत फुललेली आणि तिचा हातभार गजरा हिच्या लांब वेणीत..!
उन्हाळ्यात मोगर्याचा गजरा घातल्याशिवाय घरा बाहेरच पडायची नाही बया बाई..
आई म्हणायची, हिला एखादा गजरेवालाच बघून देऊ आपण..!
तिची चेष्टा खरी ठरली.. गजऱ्याने घात केला.. गजरेवाल्याच्या जाळ्यात ती फुलासारखी पोर अडकली..आणि एका रात्री तिच्या केसातला गजरा तिच्या मनाविरुद्ध चुरगळला गेला...
त्या आठवणींनी ती पुन्हा घुसमटली.. गजऱ्याचा वास हवेत पसरला होता..
तिने गजरा पुडीतून काढला..तिच्या डोळ्यातल्या अश्रूंनी तो कधी भिजला तिला कळलं नाही..किती तरी वेळ गेला..ती तशीच बसून होती..शून्य नजरेने...हरवलेल्या जगण्याला कुठे चाचपडू अशा विचारात..हताश..
पुन्हा दार वाजलं..पहिल्या गिऱ्हाईका साठी तयार होण्याची वेळ कधीच उलटून गेली होती..
कोरड्या पडलेल्या घशात तिने पाणी घातलं..सुजलेल्या डोळ्यात काजळ घातलं..
ओला गच्च झालेला गजरा तिने नीट केलेल्या केसात माळला..
घोटभर दारू सोबत सारं दुःख गिळून ती ओठभरून हसली..केसातला गजरा आज पुन्हा चुरागळण्यासाठी तयार झाला होता..
- रुपाली सागडे कुलकर्णी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा