लेबल

रविवार, १९ मार्च, २०२३

उसळत उधळत मस्त खळाळत

 उसळत उधळत मस्त खळाळत

सह्यकडा हा आम्ही उतरत

शिवप्रभूंच्या आम्ही हिरकण्या

परशुरामभूमीला भिजवत


नाट्यगीताच्या आम्ही ताना

थेट भिडावे असाच बाणा

नयन मनोहर जलप्रपात

गाती मधे सुरेल तराणा


श्रावणात मग जरा विसावू

पाहत सजल्या मंगळागौरी

सुबक सुंदर मोदकांच्या

नैवेद्याची खास तयारी


भाद्रपदी मग येती ललना

आवतण घेऊनि अमुच्या काठी

काठावरल्या सात खड्यांच्या

गौरी घरांस घेऊन जाती


भावतो आम्हा कोकणातला

निसर्ग पूजक साधा माणूस

दहीपोह्यांचा निवद दाखवी

थोडक्यातच सारी हौस


अशी माणसे इथे जन्मली 

तल्लख बुद्धी कणखर मने

कोकण भूमी धन्य जाहली

देउनि अनेक भारतरत्ने

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा