लेबल

रविवार, १९ मार्च, २०२३

ऐका ऐका मी हो ताप्ती

 


ऐका ऐका मी हो ताप्ती

अरबी समुद्राले धावती

खानदेशा भिजवत

पूर्णा गिरणा सांगाती 


माझ्या काठाले काठाले

जुना मानूस वसला

अजिंठ्यात खोदी लेनं 

बुद्ध त्यात गवसला


झाडा पाखरांची गानी

माझा बालकवी गाई

अवघ्या जगन्याचं सार

सांगे माझी बहिणाई


लीलावती ग्रंथ थोर

मांडे गनित भास्कर 

साने गुरूजीच्या गोष्टी 

गोड वाचती लेकरं


भरीताची चव न्यारी

अन् जोडीला भाकर

गोडी येथल्या केळ्याची

इथं येऊन चाख रं!


जडविला कोहिनूर 

महाराष्ट्राच्या मुकुटाले

खानदेशाची महती

गात पुढे मी चालले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा