आपलं कोकण
माझ्या कोकणाची गड्या
तुला काय सांगू बात
ज्याच्या माथ्यावरी वसे
स्वयं देवाजीचा हात
त्याचे गोजिरेसे रूप
जणू तान्हूलेसे बाळ
माझ्या कोकणाशी माझी
घट्ट जोडलेली नाळ
तिथे नागमोडी वाटा
कानी सागराची गाज
ओल्या वाळूवरी शोभे
शंख शिंपल्याचा साज
बागा नारळ पोफळी
गोड शहाळ्याचे पाणी
जिथे घराघरातून
ऐकू येती गोड गाणी
राजा फळांचा तो आंबा
त्याची अवीटशी गोडी
त्याचा सोबती फणस
काप्या बरक्याची जोडी
लोकं अंतरी प्रेमळ
जरी वाणी स्पष्टवक्ती
साऱ्या बांधून ठेवते
नवरसातील भक्ती
कुठे भजनाचा ठेका
कुठे देवाला गाऱ्हाणे
कुठे नमनाचा फेरं
गणेशाची आवर्तने
इथे सारेच रसिक
लोककलांचा जागर
संस्कृतीचे हे माहेर
नाना रत्नांचे आगर
चहूकडे हिरवाई
धोधो पावसाच्या सरी
अनुभवावे आतिथ्य
माया कोकणच्या उरी
गंध इथल्या मातीचा
येतो श्वासात अजून
बहरावे चोहीकडे
ह्या भूमीत रुजून
-कल्याणी बोरकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा