स्वप्नगंध
अमावस्येच्या रात्री आकाशाला जसं काळ्या रंगानं ग्रासलेलं असतं तसं काळभोर आकाश पसरलेलं! नेहमीच्या सवयीप्रमाणे मी पायरीवर बसून ह्या आकाशाकडे पाहतेय! आकाशात आत आत पाहत राहायचं... त्याचा तळ दिसतो का... माझी नेहमीची सवय... असंच पाहता पाहता नजर दूरवर लुकलुकणाऱ्या ताऱ्याकडे जातेय... विलक्षण तेजानं लुकलुकणारा तो तारा जणू मलाच बोलवतोय असं वाटून अनाहूतपणे मी त्याच्या दिशेने जातेय... चार पाऊलेही उचलली नसतील तोच... अचानक काळ्याभोर आकाशाची खोल खोल दरी झालीय आणि समोर पाहते तर काय... त्या ता-याचा एक सुंदर तरुण झालाय! तो दरीच्या त्या टोकाला... मी ह्या टोकाला... अजूनही तो मलाच बोलवतोय... हे पाहून मी चकित! ती दरी मीच पार करावी असा अट्टाहास त्याच्या डोळ्यात स्पष्ट! जणू ती दरी दरी नाहीच आहे नि मी त्याच्या चार पावलांवर आहे अशा तऱ्हेने माझ्या दिशेने त्याने दिलेला हात! सगळ्यांनीच मी स्तंभित! इतक्यात दरीतून कोणीतरी मला खिजवतंय... चित्र विचित्र चेहऱ्याने घाबरवतय... असं वाटून मी पहातेय तो काय... मीच माझ्याकडे बघून दात विचकत हसतेय मलाच घाबरवतेय... मला काहीच सुचेना असं होतंय... तोच दरीतून एक हात मला आत ओढण्याचा प्रयत्न करतोय... नी मी त्या भयंकर दरी पासून वाचण्याचा प्रयत्न करतेय... तो ओढतोय मी मागे सरकण्याचा प्रयत्न करतेय... तोच... "अगं गंधाली काय झालं? कसली दचकलीस... कसली गं स्वप्नं पाहत असतेस?" " अगं आई दचकले का मी? कशाला उठवलस मला? पुढं काय झालं ते पाहायचं होतं ना...शी! तू ना कधी कधी अवेळी उठवतेस बघ... अगं काय झालं माहित आहे का स्वप्नात? अतिशय विचित्र स्वप्न होतं.. मी ना..." " हे बघं गंधाली... अग सकाळचे सात वाजलेत आणि तुझं स्वप्न एेकायला आणि त्याचे अर्थ लावायला मला अजिबात वेळ नाही.. प्रज्ञा येईलच एवढ्यात.. हे बघ पटपटा आवर.. टेबलावर चहा नाश्ता ठेवतेय मी... प्रज्ञाला सांगशीलच ना तेव्हा ऐकेन मी....." " छे अगदीच मूड घालवतेस बघ... तुला ना स्वप्नांचे अर्थ लावता येत नाहीत ना... म्हणून असं म्हणतेस तू... असू दे मी प्रज्ञालाच सांगते..." असं म्हणत गंधालीनं पटापट सकाळची कामं आवरली...
प्रज्ञा आणि गंधालीत एक वर्षाचं अंतर... खरंतर गंधाली मोठी आणि प्रज्ञा लहान... पण स्वभाव मात्र उलट... गंधाली नावाप्रमाणे जीवनातल्या प्रत्येक रंगाचा, गंधाचा आस्वाद घेणारी... थोडीशी मुक्त, स्वतंत्र... पण तितकीच हळवी... प्रज्ञा मात्र लहान असूनही खूप विचारी... प्रत्येक विचाराच्या गाभ्यातून काही निदानं काढणारी... तात्विक विचार आणि त्यात खूप वाचनाने विचारात प्रगल्भता आलेली...बरोबर आठ वाजता प्रज्ञाची एक्सप्रेस दाखल झाली. "आई, लवकर नाश्ता दे... मला आज लवकर जायचंय... अर्धा तास आहे... ताई काय करतेय... तिचा चहा झाला का?" "नाही अगं... ती तुझीच वाट बघतेय... कसली तरी स्वप्न बघते... मग अर्थ लावायचा म्हणे...आणि तू ही नाही नाही ते कसले तरी तर्क लावतेस... जा स्वप्नच सांगणार आहे तुला..." नंतर चहा नाश्ता होईपर्यंत गंधालीचं कसंबसं स्वप्न सांगून झालं..."प्रज्ञा या स्वप्नाचा काय अर्थ असेल गं?" "ताई, खरंच विचित्र स्वप्न आहे ना... तुझाच चेहरा तुला दरीतून घाबरवतोय असं दिसलं ना तुला... या स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी नीट विचार करावा लागेल... पण आता खूप वेळ झालाय... मला आज लवकर ऑफिसला जायचंय... आपण संध्याकाळी विचार करूया. तू लवकर ये संध्याकाळी..."
प्रज्ञा आणि गंधाली दोघीही नोकरीत आणि इतर कामात कायम दंग! तरी त्यांचं संध्याकाळचं फिरणं कधीही चुकलं नाही. एवढ्या दगदगीतही हे करण्यासाठी शक्ती देणाऱ्या त्या भगवंताला त्या विसरत नव्हत्या. दररोज संध्याकाळी जवळच्या देवळात दोघी न चुकता जात. मग तिथेच शांत वातावरणात पुढच्या योजना, चर्चा करत. मग कधी काही ठरवून, कधी भांडून, कधी नुसतीच वादावादी घालत परतत.
आज दोघींना प्रश्न होता गुढ स्वप्न आणि त्याच्या अर्थाचा!
'प्रज्ञा तुला काय वाटतं हे स्वप्न खरंच भयंकर आहे ना!' "ताई स्वप्न हे माझ्या मते आपलं मन आणि आपलं अंतर्मन यांच्या एकत्रित विचाराचं दृश्य स्वरूप असतं.. आपलं मन जागृत अवस्थेत आपल्या अंतर्मनाचं बहुधा ऐकत नाही त्यामुळे हे अंतर्मन स्वप्नातून स्वतःच्या विचारांना अशी वाट करून देतं. त्यामुळे माझ्या मते स्वप्नांना अर्थ आहेच पण आपण तो बरोबरच लावू असं नाही. पण नीट विचार केला तर आपण स्वप्नांना अर्थ लावू शकतो. तुझं स्वप्न भयंकर आहे असं मला वाटत नाही.. का माहितीये का तुला दुसरं कोणी नाही तर तुझचं रूप घाबरवताना तू पाहिलं आहेस. त्यामुळं घाबरायचं काहीच कारण नाही. म्हणजे माझ्या मते तुझं मन... तुझं जे अंतर्मन करायला सांगते आहे ते करायला घाबरते आहे इतकचं..." " हे बघ प्रज्ञा या मन आणि अंतर्मनाला काय सांगायचय ते कळायला नको का... ती दरी कुठली... तो मुलगा... त्याचा या सगळ्याशी... या मनाशी काय संबंध?" " ताई, चिडू नकोस पण खरं सांगू... माझ्यामते खरा संबंध तर तिथेच आहे... हे बघ... परवा बर्वे काकांनी तुझी आणि आकाशची पत्रिका जुळण्याचे सांगितलंय नाही का.... " "आता आकाशचा काय संबंध इथं?" "हे बघ...आता पुढचा निर्णय तुलाच घ्यायचा आहे... आणि म्हणूनच तुझी अशी द्विधा मनस्थिती झालीय... तू अजूनही अमितला का विसरत नाहीयेस तेच मला कळत नाही." " प्रज्ञा, मी त्याचा विषय तरी काढलाय का? तू माझ्या स्वप्नाला कसला अर्थ देशील काय माहित? चल बघू...मला नाही ऐकायचा असला अर्थ..."
'अमित' गंधालीच्या जीवनात आलेलं वादळ! वादळ म्हणता येणार नाही...वावटळ म्हणावं लागेल... वादळ सगळं नष्ट करत; पण वावटळ नुसतं सगळं विस्कटून जातं.. नाशाच्या खुणा मागे ठेवून जातं... काहीही स्पष्ट दिसत नाही असं वावटळ! अमित आणि गंधाली ऑफिसमध्ये कामासाठी एकत्र. एकत्र प्रोजेक्ट... मग दररोज संपर्क आलाच. गंधालीचा स्वभाव मोकळा... त्यामुळे अमितचे अनेक गुणविशेष तिला थोड्याच दिवसात जाणवले. उमदा देखणा त्यात अनेक कलागुणांचे वरदान लाभलेल्या अमितच्या व्यक्तिमत्त्वाची विशिष्ट छाप गंधालीवर पडली. आणि त्यातच अमितनेच विचारणा केली... हा विचार गंधालीच्या मोकळ्या मनात कधीच न डोकावलेला... पण आता मात्र तो घुसला. संथ पाण्यात दगड टाकल्यावर जशी असंख्य वलय पाण्यात निर्माण होतात तशीच या एका विचाराने तिच्या मनात विचारांची वलयं निर्माण झाली. अमितची परिस्थिती आणि त्याचा धर्म या विचारांपुढे बुद्धी जाऊच देत नव्हती पण मन मात्र अमितच्या विचारांकडे झुकत होतं. धर्म आणि परिस्थिती का माणसाच्या हातात आहे? त्यात त्याचा काय दोष? आणि परिस्थिती तर बदलतेच. तो हुशार आहे महत्त्वाकांक्षी आहे.. एका चांगल्या मुलाला नाकारायचं तरी का? मनाचा बुद्धीशी दररोज संघर्ष सुरू झाला....आता अमितकडे विचारायला दुसरा मुद्दा नसायचा आणि रोजच्या या बुद्धीच्या नि मनाच्या संघर्षाचा अंत करायचा निर्णय गंधालीनं घेतला. बुद्धीची मनापुढे हार झाली. गंधालीनं होकार दिला. पण घरच्यांच्या विचारानं ती पुन्हा विचारात पडली... तिनं आईला समजवायचं ठरवलं कारण आईला हे अमान्य आहे हे तिला माहीत होतं... गंधालीचे आईला मनविण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि त्याचवेळी कार्यालयात बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी येऊन पडली... त्यात नाव होतं अमितच! अमितचे आई-वडील बदलीच्या आधी लग्नाची घाई करत होते त्यामुळे अमित थांबायला तयार नव्हता पुन्हा एकदा निर्णयाची जबाबदारी त्याने तिच्यावर टाकली. आता त्याचं एकीकडे मुली पहाणंही सुरू झालं... गंधाली वैतागली... अरे किती चुकतोयस तू... इकडे मला निर्णय घे म्हणतोस आणि इकडे मुली पाहत असतो म्हणजे? मी एकटीनं सगळं ठरवायचे का? तू नको का आईला सांगायला? अमित तर काहीच ऐकायला तयार नव्हता. कारण आठ दिवसात त्याला एकीकडे होकार कळवायचा होता. दोन दगडांवर पाय ठेवून तो सुरक्षित होता. गंधाली आता मात्र रागावली. रागारागानं तिनं त्याला नकार दिला आणि चार दिवसांची सुट्टी काढली. पाचव्या दिवशी ऑफिसमध्ये आल्या आल्या शिपायांनं पेढा दिला तो अमितचं लग्न ठरल्याचा! मुठीतली वाळू सळकन् निसटावी किंवा एखाद्यानं जोरदार छातीत कट्यार खूपसावी... असं गंधालीला झालं. आज दोन वर्षे झाली या घटनेला! गंधालीसाठी अनेक ठिकाणाहून विचारणा होऊ लागल्या. गंधालीची आई पेचात पडली. गंधाली नाही म्हणत होती तरी कंटाळून आईने पत्रिका द्यायला सुरुवात केली.
'आकाश बर्वे' गंधालीच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा! त्यामुळे घरगुती संबंध आपोआपच निर्माण झालेले. आकाश गंधालीपेक्षा दोन वर्षांनी मोठा. दोघांचं कॉलेजही एकच. त्यामुळे कित्येक वेळा जादाच्या तासामुळे किंवा कार्यक्रमांमुळे गंधालीला उशीर झाला तर हमखास आकाश पोहोचवायला घरी येणार. आकाशचा स्वभाव गंधाली इतका मोकळा नसला तरी गंधाली विषयी वाटणाऱ्या भावना, काळजी त्याचे पाणीदार डोळे लपवू शकत नसत. पण मनातल्या भावना त्यांनं कधीच व्यक्त केल्या नव्हत्या. शिक्षणानंतर काहीच दिवसात आकाशनं स्वतःच्या मार्कांवर उत्तम नोकरी मिळवली आणि रीतसर मागणी घातली गंधालीला! पत्रिका बघण्याचा घरच्यांचा हट्ट म्हणून पत्रिका बघितल्या... आणि आकाशची इच्छा ही जणू दैवी इच्छाच असल्याप्रमाणे पत्रिकाही जुळली होती. गंधाली सर्वांनाच आवडत असल्याने बर्वे काका आता गंधालीच्या होकाराच्या प्रतीक्षेत होते. संध्याकाळी बर्वे काका बाबांना भेटून गेल्यापासून गंधाली अस्वस्थ होती.. एकटीच कसला तरी विचार करत बाल्कनीत उभी होती.
"गंधाली, बर्वे काका पुन्हा विचारत होते. काय सांगायचं त्यांना? तू नीट विचार केला आहेस का?" आईनं विचारलं. "तू कशाला पत्रिका दिलीस... कशी काय जुळली? हे आकाशला माहित आहे का?" " तुला काय वाटतं काकांनी मनानं मागितली पत्रिका? आकाशनंच सांगितलं असणार ना? तुला तो पसंत आहे का ते सांग.." "मला काही विचारू नकोस.. मला थोडा वेळ दे. मला थोडा विचार तरी करू दे..." " ठीक आहे. पण तू विचार कर..." तेवढ्यात प्रज्ञाही येऊन टपकली... "हो ताई तू विचार कर... नाहीतर मीच विचार चालू करते..." मिश्किल हसत प्रज्ञा म्हणाली. आई झोपायला गेली. आईला जाताना पाहताच पुन्हा एकदा दूरवर नजर वळवत गंधाली पुन्हा विचारांचे धागे जुळवायला लागली. तो प्रज्ञानं तिची विचारसाखळी मध्येच तोडत पुन्हा पहिला धागा पकडला. ताई माझं म्हणणं तू पुन्हा एकदा पूर्णपणे ऐक. कारण मी तुझ्या स्वप्नाचा नीट विचार केलाय. आता मला तुझ्या स्वप्नाचा अर्थ समजलाय. तुझ्या स्वप्नाचा तुझ्या भूतकाळाशी आणि भविष्याशी संबंध आहे. तुझ्या मनाला अजुनही अमितचा विसर पडला नाहीये. त्याच्या विचारांचा, आठवणींचा हा काळाकुट्ट अंधार आहे. तर तुझं भविष्य जे तुझ्या चार पावलांवर हात पसरून उभं आहे ते तुला दूरवर असल्यासारखं दिसतयं आणि वर्तमानात तुझ्याच मनानं तुझ्या भूतकाळात व भविष्यकाळात दरी निर्माण केली आहे. दरीत स्वतःच जे रूप तू बघतेस ना ते तुझं वर्तमानातलं मन आहे जे तुला तुझ्या उज्वल भविष्याकडे जाण्यास घाबरवतेय. प्रज्ञा एखाद्याला विसरणं जितकं तुला सोपं वाटतं ना तितकं सोपं नाहीये ते! आठवणींचा का कधी अंधार असतो आणि माझं मन मला का घाबरवतेय...." ताई खरं सांगू... विसरता येत नाही असं म्हणतेस ना तेव्हाच तर तू आठवतेस. मला सांग बरोबर तुझ्या लग्नाचा विषय सुरू झाल्यावरच तुला का आठवण येते? तर याला कारण आहे तुझं अपयशी मन!" " काय अपयशी मन?" "हो अपयशी मनच.. जे तू करण्याचा प्रयत्न केलास त्यात तुला यश मिळालं नाही.. त्याहीपेक्षा तुझ्या प्रयत्नांचा अंत व्हायच्या आधीच अमितनं स्वतःचा निर्णय स्वतः घेतला. हे.. हेच तुझं मन स्वीकारत नाहीये. कोणीतरी आपला विचार असा सोडलेला... तू म्हणजे तुझं मन... सहनच करू शकत नाहीये. ते अपयश तुला सारखं आठवतं. ताई अपयश पचवणं फार अवघड आहे. आणि आपण स्वीकारलं नाही तर फारच अवघड... आणि आठवणींचा अंधार का म्हणतेय... माहितेय मी.. खरं तर आठवणींना कवींनी अनेक नावे, अनेक उपमा दिल्या आहेत. कुणी आठवणींना बकुळीच्या फुलाची उपमा दिली आहे... तर कोणी मोरपिसाची.. पण खरं तर प्रेमातल्या आठवणी अशाच असल्या पाहिजेत... बकुळीच्या फुलाप्रमाणे आपला मोहक गंध मागे ठेवणाऱ्या किंवा मोरपिसासारख्या अलवार, नाजूक...ज्या जीवनात जगायला उत्साह देतील... म्हणूनच तर मुमताजच्या आठवणींनी ताजमहालासारखं सुंदर शिल्प उभं करण्याची प्रेरणा शहाजहानला दिली. अशा असाव्यात आठवणी.. प्रेरणादायी... पण तुझ्या अमितच्या आठवणी मात्र तुला भविष्याकडे बघण्याचं धाडस प्रेरणा द्यायच्या ऐवजी भविष्याकडे पाहायलाही घाबरवत आहेत... मग अशा आठवणींना अंधारच म्हणायला हवं ना... ताई शेवटी ही सगळी माझी मतं आहेत. तर्क आहेत... पण जरा माझ्या मतांचा विचार कर. अमितला शेवटचा नकार देताना आई-बाबांच्या मतांचा, त्यांच्या इच्छांचा विचार केलास आणि योग्य निर्णय तू घेतलास. तसाच आताही घे. खूप वेळ झाला आता.. आणि उद्या सुट्टीच आहे. त्यामुळे तुला विचार करायला आणि आपल्याला बोलायलाही खूप वेळ आहे. त्यामुळे झोपूया का आता?"
गंधालीनं उशीवर डोकं ठेवलं पण प्रज्ञाच्या मतांनी बुद्धीला जागं केलं. विचार करण्यास भाग पाडलं. आज पर्यंतच्या शाळा कॉलेजच्या जीवनात यशानं सावलीसारखी साथ दिली होती गंधालीला! कॉलेज नंतरही अनेक स्पर्धा परीक्षा विनासायास उत्तीर्ण झालेली! अपयश काय असतं हे कधी पाहिलंच नव्हतं... तिला जे जे पाहिजे ते ते मिळवलं होतं तिनं... गंधालीच्या डोक्यात विचारांची गर्दी झाली. अमितबरोबरचे सगळे क्षण डोळ्यासमोर तरळले. अमितबाबतीत कुठलाही भाव किंवा भावना त्याला पाहता क्षणीच कधी वाटल्या नव्हत्या. त्यांनं विचारल्यावरही आश्चर्यच वाटलं होतं त्यावेळी... घरचा विचार आधी मनात आला होता पण पुन्हा पुन्हा प्रेमाची ग्वाही अमितच देत होता. त्याच्या प्रेमाचा अपमान केवळ धर्म आणि परिस्थितीसाठी करायचा त्यापेक्षा आईला समजावलं तर काय वाईट होणार आहे.. या विचारांनी आणि या गोष्टीची पूर्ण कल्पना अमितला देऊनच अमितला होकार दिला होता... पण कुणाची मतं कुणाचे परंपरागत विचार असे सहज बदलता येतात का? पण प्रेमाची ग्वाही देणारा अमित मात्र थांबायलाही तयार नव्हता आणि त्यापेक्षा कमाल म्हणजे चक्क लग्न केलं त्यानं... त्याच्या दृष्टीने प्रेम म्हणजे केवळ एक प्रस्ताव होता... मी मात्र त्याच्यासाठी किती विचार केला होता...खरचं प्रज्ञा म्हणते ते फारसा चूक नाहीये... आजपर्यंत प्रत्येक ठरवलेली गोष्ट मिळवलीय मी पण अमितच्या बाबतीत मात्र मी अयशस्वी झाले... खरंच दरीत माझं भयानक रूप मी पाहिलं ते माझं अपयशी मन तर नाही.. माझ्यावर हसणारं...ह्या विचारातून बाहेरच न पडू देणारं...
खरंच किती विकार आणि विचारांनी बरबटलेलं आहे हे मन! भावनांत वाहवत जाणारं मन! क्षणभर का होईना पण घरचा विरोध कळत असताना होकार द्यायला बहकवणारं मन! पण त्याचवेळी अंतर्मन पुन्हा पुन्हा नकार घंटा वाजवत होतं....वयाची 25 वर्षे ज्यांना जवळून बघितलं... त्यांची मतं, ज्यांचं मन...ज्यांची मनं एखाद्या उघडलेल्या पुस्तकाप्रमाणेच वाचावी अशी.. त्यांचा नकार स्पष्ट आहे हे पुन्हा पुन्हा दाखवणार अंतर्मन... खरंच हे विकारी मन कायम अंतर्मनाला दबवायला बघतं... म्हणूनच अंतर्मन स्वप्नातून विचारांना दृश्यरूप द्यायला बघत असावं. ती दरी पार करून... आजवर ज्या भूतकाळात मी अडवून पडली आहे तिथून बाहेर पडून अपयशी मनाशी संघर्ष करून मी भविष्याकडे जावं असं तरी सांगायचं नाही ना या अंतर्मनाला! ताऱ्याचा झालेला सुंदर तरुण म्हणजे माझं भविष्य तर नव्हे?
श्रावणाच्या एका हलक्या सरीनं आसमंतातलं सगळं मळभ निघून जावं आणि लख्ख कोवळं ऊन सभोवार पसरावं आणि प्रत्येक जीवाला नवं सौंदर्य मिळावं तसं गंधालीला वाटू लागलं. एका अपयशाचा स्वीकार केल्यावर प्रत्येक गोष्ट स्पष्ट दिसू लागली. अंतर्मनांनं दिलेली हाक मनावर विजय मिळवून साद द्यायला भाग पाडू लागली... एक नवीन विचार मनात रुजवत गंधाली पुन्हा स्वप्न राज्यात शिरली... पण आज तिनं जीवनाचा खरा अर्थ जाणला होता.
माणसाचं जीवन एखाद्या नदीसारखं असावं. नदी जशी वाटत जे जे मिळेल ते ते स्वतःत सामावून वाहत राहते. तसंच जीवनात येणाऱ्या यशांना आणि अपयशांनाही स्वीकारत माणसानं पुढे पुढे जायला हवं... हे तिनं आज जाणलं होतं. आता कुठलंही अपयश तिला घाबरवणार नव्हतं. कारण अंतर्मनाची साक्ष गंधालीला पटली होती... सोनेरी भविष्यकाळ तिच्यापुढे हात पसरून उभा होता आणि आता दरी तर केव्हाच पार झाली होती!
✒️ सौ. सारिका दत्तात्रय बिवलकर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा