लेबल

रविवार, १९ मार्च, २०२३

झोळी, पाळणा, झोका, झुला, हिंदोळा..

 जय गणेश


झोळी, पाळणा, झोका, झुला, हिंदोळा..


तुझी नावसुद्धा किती लयीत आहेत ना.. मला तर ना खूप हेवा वाटतो तुझा..जो तुला स्पर्श करेल त्याला तू अप्रतिम आनंदाचा आणि समाधानाचा खजिनाच उघडून देतोस.. निरागस आणि निखळ आनंदाचा स्पर्श म्हणजेच परीसस्पर्श जणू.. 

तुझी नी माझी पहिली ओळख झाली ती माझ्या आईच्या गर्भात.. नाळेला धरून ज्या काही उड्या मारल्या त्या माझ्या ह्या झुलण्याच्या वेडाच पहिलं पाऊल..


नंतर जेव्हा तुझ्या अंगाखांद्यावर माझ्या. आईला छान वाडी घालून सजवल.. झुलवल.. काय भारी वाटलं म्हणून सांगू.. माझी आई तर त्या झोक्याला सोडायला तयारच नव्हती.. पण कोणी काही म्हणू नये म्हणून ज्याला त्याला सांगत होती की बाळाला झुलयाचय.. माझे डोहाळेच असे आहेत .. कसली भारी गंमत आहे ना ही.. आजपर्यंत हे गुपित तिने कोणालाच नाही सांगितलं.. तेव्हा खरं आश्चर्य वाटलं पण आता नीट कळतय की ती पण माझ्यासारखीच तुझ्यासाठी वेडी होती.. 


तुला माहित आहेच की त्यानंतर थोड्याच दिवसात मी ह्या जगात अवतीर्ण झाले… आणि झाल्या झाल्या माझ्या आजीने जवळ घेतलं.. माझा आकांडतांडव बघून तिने हलकेच हातात झुळवल.. आणि काय चमत्कार.. मी एकदम शांत .. रडणं गायब.. तेव्हापासून आजी माझ्या आवडीची झाली ती शेवटपर्यंत.. तिने हे अगदी पक्क लक्षात ठेवलं आणि आईला आवर्जून सांगितलं की बाई ग लेकरू तुझ्यावरच गेलंय.. झुलवल की शांत होतंय.. आजीचा हा कानमंत्र माझ्या आईने अगदी मी मोठी होईपर्यंत व्यवस्थित लक्षात ठेवला.. म्हणून माझं चांगलच फावल..कधी पाळणा तर कधी झोळी.. हा आमचा कायमचा ठिकाणा..पोट भरलं की आमची रवानगी तिथे होई आणि मग आई मला खेळवत खेळवत सगळी कामं करी.. पण इथे माझी एक खास गंमत होती.. ह्या पाळण्यात किंवा झोळीत मला आईच्या किंवा आजीच्या साड्या लागत..दुसर काहीही टाकलं तर मी नुसती चुळबुळ करायची. तुला म्हणून सांगते मला पाळण्यापेक्षा झोळी जरा अंमळ जास्तच आवडायची. त्यात मुटकुळ करून झोपताना आईच्या कुशीत शिरून झोपल्या सारखं वाटायचं.. एक उबदार, मऊ आणि प्रेमळ माया होती. त्यात अजून एक मज्जा म्हणजे गावाला गेल्यावर बाहेर अंगणात आजी झोळी बांधायची माझ्यासाठी.. तेव्हा आजूबाजूला गायीचा, बकरीचा, बैलगाड्यांच्या घुंगरांचा, शेजारच्या लोकांचा असे वेगवेगळे आवाज येई.. मला ह्या सगळ्यात सुद्धा भारी झोप लागायची.. हळुवार सावलीत आणि गार वाऱ्याच्या सोबतीला आजी जुनी गावाकडची गाणी गात, गप्पा गोष्टी करत करत मला झोपावयची..आणि मी झोपले की ती प्रेमाने त्या तिच्या गुराढोरांना सांगायची.. माझी नात झोपलिया, उगा कालवा  करू नगा.. आणि खरचं त्यांना समजल्यासारख ती शांत राहायची.. पण जरा माझी चुळबुळ जाणवली की सगळे आवाज करून आजीला बोलवायचे.. बोलता नव्हतं येत मला.. पण हे सगळे कळायचं..


ह्या सगळ्या हिंदोळ्यावर झुलतच मोठी झाले.. आईच्या घरी आई आणि बाबांनी आवडीने आमच्या शहरातल्या घराच्या छताला टांगलेला लहान मुलांचा झोका आणला.. पहिल्यांदा त्यात बसले..आणि कोण आनंद झाला मला.. मग ठरवलंच हीच आपली जागा.. जेवण काय आणि झोप काय सगळ ह्याच्यातच.. ह्यात बसून झोका घेत खिडकीबाहेर बघायचं आणि आज कोणता नवीन पक्षी दिसेल ह्याचा अंदाज घ्यायचा.. आईने ह्या सगळ्यांसाठी खिडकीत खाऊ आणि पाणी ठेवलेलं असायचं..म्हणून कधी पोपट, कावळा, मैना, कोकीळ, कोकिळा, पारवा, तर कधी एकदम छोट्या रंगीत चिमण्या यायच्या.. त्याच्याबरोबर माझंही जेवण मी लवकर करत असे आणि एवढंच नाही तर सगळं खात असे. आईने बाबांना कितीदा शाबासकी दिली हा झोका आणल्याबद्दल.. 

आता थोडी अजून मोठी झाले आणि तो झोका लहान.. पण ओढ तीच किंबहुना काकणभर जास्तच होती.. त्या ओढीमुळेच बाबांना सुट्टीच्या दिवशी मला बागेत नेणे सक्तीचे होते.. त्यासाठी रविवारी न कुरकुरता सकाळी लवकर उठायचे मी.. आता मी थोडी अजून मोठी झाले .. शाळेत जाऊ लागले.. तेव्हा शाळेतले झोके हे फक्त माझ्यासाठीच आहेत असा हक्क सांगायचे मी.. नाही मिळाला की तारस्वर लावायचा लगेच.. असं केलं की पहिले काही दिवस इतरांनी लगेच मला झोका दिला.. पण नंतर शिक्षकांनी अगदी स्पष्ट सांगितलं की तू कितीही रडली तरी तुझी जेव्हा पाळी येईल तेव्हाच तुला झोका मिळेल.. आणि माझा लाडका .. जीव की प्राण झोका मला दुसऱ्यांना द्यावा लागला.. शाळेतून नेताना माझा बटरासारखा चेहरा पहिला की आईला कळून चुकायच की आज मला झोका खेळता नाही आला. मग बाबा घरी आले की एकच पालुपद की मला झोका हवा.. ह्यात बरेच दिवस गेले म्हणजे वर्षच म्हण ना 

आणि अचानक आम्ही एके दिवशी गावाला गेलो.. गावाला खूप दिवसांनी जात होते.. गेल्या गेल्या आजी आजोबांच्या पाया पडून त्यांना पहिली कडूकडून मिठी मारली. तेवढ्यात आजीनी मला हाताला धरून एक गंमत दाखवली. ती गंमत पाहून मी आता थोडी मोठी घोडी होऊन सुद्धा लहान पोरी सारख्या उड्या मारल्या.. काय असेल ओळखलं का तू.. 


अरे आजोबांनी बाहेरच्या अंगणात एक मला मोठ्ठा चोपाळा बसवला होता.. त्याच्यावर मी, आणि आजीआजोबा एकावेळी बसू शकत होतो.. अक्षरशः आकाश ठेंगणं झालं होत. मी तर अन्नपाणी विसरून त्यावर झुलत झुलत आजी आजोबांबरोबर मारलेल्या गप्पांनीच माझं पोट भरलं. त्या चोपाळ्यावर घेतलेल्या प्रत्येक झोक्या बरोबर आजी आजोबांचा तो प्रेमळ सहवास अजूनच हवाहवासा वाटे.. 

तेवढ्यात गावातली माझी मैत्रीण म्हणालो की चल शेतात खेळू.. मला खरंतर जायचच नव्हत पण सगळे म्हणाले म्हणून गेले तिच्या बरोबर.. थोड अंतर गेल्यावर थकायला झालं पण मुलांचा गलका ऐकून तिथं कधी पोहचते असं झालं. तिच्याबरोबर जवळ जवळ पळतच आम्ही तिथे पोहचलो. तिथे पोहचताच मी तर आ वासून बघतच राहिले. काय होत तिथं असं..

अरे तिथं तर खूप झाडं होती..एका मोठया झाडाच्या वेलीला धरून काही मुलं लोंबकळत होती तर जवळच्याच दोन तीन झाडांना दोरीचे झोके बांधले होते तर काहींना गाडीचा टायर दोरी मध्ये अडकवून झोका बांधला होता. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो अजून पाच डोळे देतो असं झालं होत मला. ती मुलं झाडाला लोंबकळत कोणता खेळ खेळतात असं विचारलं तर मैत्रीण म्हणाली की हा तर सूर पारंब्या.. हे वडाचं झाड आणि हे लोंबकळत असलेली त्याची मुळं.. खूप मजबूत असतात ती.. त्याला धरून आपला तोल सांभाळून मस्त पाय वर धरून झोका घ्यायचा.. काय भारी मज्जा येते.. तिचं हे बोलणं ऐकून मी तिला ओढत ओढतच मला शिकवायला चल म्हणाले. तेव्हापासून त्या सगळ्यांशी आणि माझ्या गावातल्या घराशी माझं एक वेगळच नातं सुरू झालं. घरात आलं की चोपाळा आणि शेतात सुरपारंब्या, झाडाचा झोका हेच चालू होत.  

आजी एकीकडे चोपाळ्यावर गप्पा मारत हळूहळू जमिनीवरच झोका घेत तिचा संस्कारांचा ठेवा मला देत होती तर एकीकडे मी मैत्रिणींबरोबर झाडाला बांधलेल्या झोका घेत आकाशाला गवसणी घालत होते.. ह्यावेळेस हा झोका मला वेग, वेळ, जागा आणि त्याला लागणारी ऊर्जा ह्यांचं वेगळच गणित शिकवून गेला. जेवढा जोर लावत जास्त झोका घेशील तेवढाच पटकन तो परत जमिनीवर येईल. वारासुद्धा अगदी झोंबणारा आणि वेड लावणारा असेल. पण जरा पकड सैल झाली की जीवाशी खेळ..

पण हेच चोपाळा झोका घेताना पाय जमिनीवरच ठेवायला सांगतो, हळूहळू का होइना पण मन समाधानाने तृप्त करतो..


हीच शिकवण लक्षात ठेवत मोठी झाले. जिथे जिथे आणि जेव्हा जमेल तेव्हा झोक्याची हौस भागवत राहिले. 

आता मात्र एका वेगळ्या वळणावर येऊन उभी राहिले.. आता इथे कोणत्याही झोक्याशिवाय मला स्वतःला एक झोका घ्यायचा होता.. सगळी बंधन पाळत मनाचं ऐकायचं होत. शिक्षण झालं.. नोकरीचा श्रीगणेशा झाला आता मनाचा झोका ज्याच्यासाठी झोका घेइल त्याला शोधायचं होत. मी न सांगताच माझी अलिखित अट आईला माहित होती.. आणि लवकरच आम्हाला आमचा झोका सापडला. आई आणि बाबांना सगळं आवडल्यानंतर तिकडे घरी गेले होते.. घरात गेल्या गेल्या त्यांनी ठरवलं की तेच माझं घर.. कसं ठरवल म्हणून विचारतो . अरे इतक्या कमी जागेत सुद्धा त्यांनी त्यांच्या जागेत बांबूचा झोका बांधला होता.. काय तर म्हणे त्यांच्या लेकाची खास जागा आहे ती . त्याला खूप आवडतो. 

नंतर सर्वांच्या आशीर्वादाने सगळं कार्य  सुखरूप पार पडलं.. आणि एका निवांत क्षणी माझा सखा मला म्हणाला की आजपासून हा झोका आपला.. एकत्र जमिनीवर तर एकाचवेळी आकाशात जाऊ. फक्त साथ सोडू नको.. माझ्यासारखीला अजून काय हवं.. नव्या नवलाईच्या दिवसात झोक्याबरोबर कधी जमीनीवर, कधी अधांतरी तर कधी आकाशात असं करत सगळा तोल सांभाळत होते. जरा सैल पकड झाली तर घरचे होतेच.. ह्यामुळे माहेरचे सगळे सुखावले. आपल्या सदैव झोक्यावर झुलणाऱ्या लेकीचा झोका आता कुठे स्थिरावला होता.. 


हे सगळं असं छान सुरू असतानाच.. आता परत नवीन उत्साह संचारला.. नवीन जमवाजमव सुरू झाली.. आताशा परत मला जेवण फक्त झोक्यावरच जात होत.. परत एकदा झोक्याच्या साथीनं मी एका नवीन जबाबदारीसाठी स्वतःला तयार करत होते.. आज त्याचा सोहळा .. परत एकदा झोपाळा खास सजला, हिरवाईने मोहरलेली मी हळूच त्या झोपाळ्यावर बसले.. आता मात्र तो धसमुसळेपणा नावाला सुद्धा नव्हता. आईच्या डोळ्यात आता खरं कौतुक आणि समाधान दिसत होत. ओटी भरत हळूच झोका देत तिने माझी हौस पुरवली.. माझे खरे डोहाळे तिला न सांगताच कळले.. दोघींच्या डोळ्यात अनाहुत पाहुण्यांनी गर्दी केली.. आई म्हणाली की एक झोका मी घेतला आणि तो आयुष्यभर जेवढा हवा तेवढ्याच उंचीवर नेला.. आता तुझी पाळी.. एक वर्तुळ पूर्ण झालं.  आता एका नवीन वर्तुळाची सुरुवात. झोकयाची शिकवण लक्षात ठेव.. पाय जमिनीवरच आणायचे काहीही झालं तरी आणि आता हात नाही सोडायचे.. आईचं बोलणं ऐकून मला माझा झोपाळा अजूनच मोलाचा वाटला. हळूहळू झोका घेताना आता त्याला अगदी घट्ट धरला.माझ्या हक्काच्या पाठिराख्यासारखा, माझ्या जवळच्या लोकांसोबत, माझ्या जन्माच्या सख्याबरोबर आणि माझ्या नव्या पाहुण्याबरोबर..



🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


© हर्षाली वाघोले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा