भोंडला 2023
मागच्या वर्षी स्मिता ताईने भोंडल्यावर एक सुंदर लेख लिहला
मनातल्या एका कोपऱ्यात भोंडला जणू जिवंत झाला
आसावरी ताईच्या कल्पनेतून एक मस्त आयडिया आली
माता पालकांचा भोंडला करू ह्यावर सहमती झाली
मागच्या वर्षीच्या पेक्षा उत्साहाला अजून उधाण आलं
सगळं अगदी नीटनेटक करायचं असं ठरलं
मग काय योगिनी आणि भाग्यश्री ताईने चंगच बांधला
एक हाती तडीस नेणार ह्यात काही संशय नाही उरला
तारखेचा गणित थोड पुढे नक्की गेलं
पण म्हणून कोणी काही नाराज नाही झालं
वर्ग प्रतिनिधीने मग कामाला सुरुवात केली
फॉर्म भरा आणि जीपे करा अशी वर्गावर्गत हाक दिली
परीक्षेचा बागुलबुवा आम्ही नाही करत
भोंडल्याची नामी संधी आता नाही चुकत
चल पटकन नाव नोंदव, असे प्रेमळ हट्ट एकमेकींना करू लागल्या
हा हा म्हणता मनामधे भोंडल्याचे इमले बांधू लागल्या
नियोजन गटाची आता सुरू झाली लगीनघाई
सगळं अगदी व्यवस्थित होणारच हा विश्वास ठाई
अखेर ती २९ ऑक्टोबर रविवारची संध्याकाळ उजाडली
इयत्तेनुसार ठरलेला रंग परिधान करत सगळ्यांनी वेळ पाळली
हिरवा, पांढरा, लाल, पिवळा, निळा, गुलाबी आणि जांभळा
आजी आणि माजी माता पालकांचा गच्चीत जमू लागला गोतावळा
भोंडल्याची गाणी म्हणत फेर धरला प्रेमाने
काही जुन्या गाण्यांची उजळणी झाली आज नव्याने
दोघींची, तिघींची आणि सगळ्या वर्गाची अशी फुगडी खेळलो
पुन्हा एकदा सगळ्या आम्ही सर्वार्थाने लहान झालो
खिरापत ओळखताना चांगलीच भंबेरी उडाली
अखेर बऱ्याचवेळाने चंद्रकला सापडली
समोसा, फ्रुटी, कच्छी दाबेली आणि चंद्रकला
मैत्रिणींबरोबर बसून खाऊन जीव अगदी तृप्त झाला
अगदी सुटसुटीत आणि देखणा कार्यक्रम वेळेत संपन्न झाला
सगळ्या जणींनी एकमेकींना निरोपाचा विडा दिला
सगळे व्याप सांभाळत आज माझ्या सख्या खास भोंडल्याला जमल्या
नवीन ओळखी, हसणं, मन प्रफुल्लित करणं, हे नवीन दागिने ल्याल्या.
भोंडला असो वा हादगा, हे तर एक निमित्त आहे
स्त्रीशक्ती एकत्रीकरणाची ही तर एक खास रीत आहे
असेच सदैव आपण सगळे मिळून संघटीत होऊया
मुलांबरोबर प्रबोधिनीत येऊन आपलं वेगळंपण जपूया
पुनरागमनायच… धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
© सौ. हर्षाली वाघोले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा